S G GROUP

S G GROUP
📣 कॉल करा – जाहिरात मिळवा: 7463963939

जोतिबा चैत्र पौर्णिमा यात्रेसाठी प्रशासन सज्ज; भाविकांना अडचण नको – जिल्हाधिकारी अमोल येडगे

 प्लास्टिक वापराबाबत कडक निर्बंध घालण्याच्या सूचना मंदिर व परिसर विकास आराखड्याबाबत ग्रामस्थांकडून आभार व्यक्त

जोतिबा यात्रा 2026 तयारी बैठक कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे
जोतिबा यात्रेच्या तयारीचा आढावा घेताना कोल्हापूर जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर, दि. १८: श्री क्षेत्र वाडीरत्नागिरी येथे १ एप्रिल रोजी होणाऱ्या श्री जोतिबा देवाच्या चैत्र पौर्णिमा यात्रेच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने व्यापक तयारी सुरू केली असून, यात्रेदरम्यान भाविकांना कोणत्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना करण्यात येत आहेत. याच अनुषंगाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या अध्यक्षतेखाली जोतिबा डोंगरावरील यात्री निवास हॉल येथे विशेष आढावा बैठक पार पडली.

या बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक योगेशकुमार, मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस. यांच्यासह विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.  महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांतून मोठ्या संख्येने भाविक येत असल्यामुळे यंदाच्या यात्रेचे नियोजन अधिक प्रभावी आणि वेळेत पूर्ण करण्यावर भर देण्यात आला. पन्हाळा प्रांताधिकारी समीर शिंगटे आणि तहसीलदार माधवी शिंदे यांनी मागील वर्षीच्या यात्रेदरम्यान केलेल्या कामकाजाचा सविस्तर आढावा सादर करत यंदाच्या नियोजनासाठी आवश्यक सूचना मांडल्या.

बैठकीनंतर जिल्हाधिकाऱ्यांनी जोतिबा डोंगर परिसराची प्रत्यक्ष पाहणी करून विविध सुविधा व व्यवस्थेचा आढावा घेतला. यात्रेदरम्यान पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने प्लास्टिक वापरावर कडक निर्बंध घालण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, डोंगर परिसरात स्वच्छता राखण्यासाठी अतिरिक्त मनुष्यबळ नियुक्त करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत.  तसेच भाविकांच्या सोयीसाठी पिण्याच्या पाण्याची आणि शौचालयांची पुरेशी व्यवस्था करण्यावर भर देण्यात आला आहे.

जोतिबा यात्रेसाठी मोठी तयारी! लाखो भाविकांसाठी प्रशासन सज्ज

याशिवाय दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी रांगांचे योग्य नियोजन करून त्या ठिकाणी सावली आणि पाण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याबाबतही प्रशासनाने स्पष्ट निर्देश दिले आहेत. यात्रेदरम्यान भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासन, आरोग्य सेवा सुरळीत ठेवण्यासाठी जिल्हा आरोग्य अधिकारी आणि सीपीआर रुग्णालय, तसेच प्रवास व्यवस्थेसाठी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ आणि केएमटी परिवहन विभाग यांना जबाबदाऱ्या सोपवण्यात आल्या आहेत. वीज पुरवठा, प्रादेशिक परिवहन कार्यालय, आपत्ती व्यवस्थापन आणि सार्वजनिक बांधकाम विभाग यांनाही समन्वयाने काम करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

दरम्यान, श्री जोतिबा मंदिर व परिसर विकास आराखड्यास शासनाची मंजुरी मिळाल्याबद्दल स्थानिक ग्रामस्थांनी समाधान व्यक्त करत शासनाचे आभार मानले. यात्रेदरम्यान कोणतीही अडचण निर्माण होऊ नये आणि सोहळा शिस्तबद्ध पद्धतीने पार पडावा, यासाठी सर्व यंत्रणांनी सूक्ष्म नियोजन करून कार्यवाही करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी यावेळी केले.


     अजून वाचा :     
🔴 माधुरी उर्फ महादेवी हत्तीणीला नांदणी मठात परत आणण्यासाठी राज्य शासनाचा पुढाकार | CMO Maharashtra

Post a Comment

0 Comments