वारणानगर / प्रतिनिधी : येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त विश्व हिंदी पंधरवडा उत्साहात संपन्न झाला. यानिमित्ताने आयोजित "आंतरराष्ट्रीय प्रश्नमंजुषा"(इंटरनॅशनल क्वीज), कार्यक्रमाला देश-विदेशातून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. हिंदी भाषेच्या प्रचार- प्रसारासाठी आणि विश्व हिंदी दिवसाचे महत्त्व जगभरातील लोकांना कळावे या निमित्ताने या प्रश्नावलीचे आयोजन करण्यात आले होते. हिंदी विभाग अध्यक्ष प्रा. डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांच्या अथक प्रयत्नांतून संपन्न झालेल्या या उपक्रमाला श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे- सावकर, मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. व्ही. व्ही. कार्जीनी, प्राचार्य डॉ. ए.एम. शेख यांनी शुभेच्छा दिल्या. ऑनलाइन तंत्रज्ञानाचा उपयोग करून देशभरात अशा पद्धतीचा एक आगळावेगळा उपक्रम प्रथमच संपन्न झाल्याबद्दल जगभरातील मान्यवरांनी कौतुक केले आहे.
विश्व हिंदी सचिवालय मॉरिशस, "वागीश" अंतरराष्ट्रीय संस्था दुबई, शिवाजी विद्यापीठ हिंदी प्राध्यापक परिषद, संशोधक विचार महासंघ कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने संपन्न झालेल्या या आंतरराष्ट्रीय मंजुषा स्पर्धेत विदेशातील रशिया, ब्रिटन, मॉरिशस, दुबई, बहरीन,कतार, कुवेत, हॉलंड, ऑस्ट्रेलिया, सिंगापूर, युक्रेन, अमेरिका, नेदरलँड, सुरिनाम, न्युझीलँड, चीन इत्यादी देशातील ३३ हिंदी प्रेमी विद्वानांनी तर देशातील ८०० हून अधिक, हिंदी संशोधक, विद्यार्थी, अभ्यासक, पत्रकार, लेखक, मीडियाकर्मी यांच्यासह प्रत्येक राज्यातील आणि विद्यापीठातील मान्यवरांनी सहभाग नोंदवून ऑनलाइन प्रमाणपत्र ही प्राप्त केली आहेत.
0 Comments