S G GROUP

S G GROUP
📣 कॉल करा – जाहिरात मिळवा: 7463963939

प्रा. (डॉ.) प्रकाश चिकुर्डेकर यांची सांगलीच्या श्रीमती चंपाबेन वालचंद शाह महिला महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी नियुक्ती

प्रा. डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांनी सांगलीच्या श्रीमती चंपाबेन वालचंद शाह महिला महाविद्यालयाच्या प्राचार्यपदाचा पदभार स्वीकारला
 

सांगली (प्रतिनिधी) : 

                           शिक्षण, संशोधन आणि साहित्यसेवा क्षेत्रात चार दशकांहून अधिक काळ उल्लेखनीय योगदान देणारे ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ प्रा. (डॉ.) प्रकाश शंकरराव चिकुर्डेकर यांची सांगली येथील श्रीमती चंपाबेन वालचंद शाह महिला महाविद्यालयाच्या प्राचार्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संस्थेच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत त्यांनी नुकताच पदभार स्वीकारला. चिकुर्डे (ता. वाळवा, जि. सांगली) येथील मूळ रहिवासी असलेल्या डॉ. चिकुर्डेकर यांनी एम.ए., बी.एड., एम.फिल. आणि पीएच.डी. (हिंदी) या उच्च शैक्षणिक पदव्या संपादन केल्या आहेत. शिवाजी विद्यापीठात सर्वोच्च प्रथम श्रेणी मिळवत त्यांनी आपल्या शैक्षणिक गुणवत्तेची छाप उमटवली आहे. शिक्षण क्षेत्रातील तब्बल ४१ वर्षांच्या कारकिर्दीत त्यांनी ३५ वर्षे पदवी स्तरावर, २६ वर्षे पदव्युत्तर स्तरावर तसेच शांतिनिकेतन, सांगली येथे सहा वर्षे प्राथमिक स्तरावर अध्यापन केले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली घडलेले अनेक विद्यार्थी आज राज्य आणि देशभरातील विविध क्षेत्रांत महत्त्वाच्या पदांवर कार्यरत आहेत.

वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयात हिंदी विभागप्रमुख म्हणून कार्यरत असताना त्यांनी विद्यार्थ्यांमध्ये हिंदी साहित्याची आवड निर्माण केली. २००३ पासून पीएच.डी. संशोधन मार्गदर्शक म्हणून त्यांनी अनेक संशोधक घडविले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पाच संशोधकांनी पीएच.डी. तर तीन विद्यार्थ्यांनी एम.फिल. पदवी प्राप्त केली असून सध्या पाच संशोधक संशोधन कार्य करीत आहेत. डॉ. चिकुर्डेकर यांचा ‘रामदरश मिश्र के उपन्यासों में समाज-जीवन’ हा संशोधनग्रंथ राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित झाला आहे. तसेच ‘आधुनिक हिंदी साहित्य में वैषम्य विविध के आयाम’ हा ग्रंथ विशेष चर्चेत राहिला आहे. त्यांच्या शंभरहून अधिक शोधनिबंधांचे प्रकाशन झाले असून त्यांनी ३६० हून अधिक राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये सहभाग नोंदविला आहे. ५०० हून अधिक व्याख्यानांद्वारे त्यांनी साहित्य, संशोधन आणि शिक्षण क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याचा गौरव विविध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी करण्यात आला आहे. त्यामध्ये अमनसिंह आत्रेय राष्ट्रीय पुरस्कार, साहित्य रत्न सन्मान, विश्वगुरू भारत गौरव सन्मान, ग्लोबल पीस अवॉर्ड आणि भारतेंदू हरिश्चंद्र हिंदी सेवी सन्मान यांचा समावेश आहे.

यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाला चौथ्यांदा ‘नॅक A+’ मानांकन मिळवून देण्यात तसेच शिवाजी विद्यापीठाच्या शैक्षणिक व प्रशासकीय लेखापरीक्षणात ‘A+’ श्रेणी प्राप्त करण्यात त्यांचे योगदान मोलाचे राहिले आहे. श्रीमती चंपाबेन वालचंद शाह महिला महाविद्यालय हे सांगली जिल्ह्यातील एक प्रतिष्ठित शैक्षणिक केंद्र असून ते एस.एन.डी.टी. महिला विद्यापीठाशी संलग्न आहे. महिलांना गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने स्थापन झालेल्या या महाविद्यालयाने शैक्षणिक, क्रीडा, सांस्कृतिक आणि व्यक्तिमत्त्व विकासाच्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. वारणा उद्योग समूहाचे अध्यक्ष तथा आमदार डॉ. विनय कोरे आणि डॉ. व्ही. व्ही. कार्जीनी यांनी डॉ. चिकुर्डेकर यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.


    इतर बातम्या :  

📰 पत्रकार बाबासाहेब जाधव यांना ‘निसर्ग सन्मान - राज्यस्तरीय पुरस्कार २०२६

📰 पन्हाळ्यातील नायब तहसीलदार संजय वळवी यांना ‘उत्कृष्ट नायब तहसीलदार’ पुरस्कार

Post a Comment

0 Comments