स्पर्धा परीक्षांकडे वाढता कल; २५ हून अधिक यशवंतांचे मार्गदर्शन ठरणार प्रेरणादायी...
वारणानगर (प्रतिनिधी) :
सुराज्य फौंडेशनतर्फे यु.पी.एस.सी. (UPSC) परीक्षेत यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा ‘व्हिजन २०२६’ गौरव सोहळा शनिवार, दि. ११ एप्रिल २०२६ रोजी वारणानगर येथे मोठ्या उत्साहात आयोजित करण्यात आला आहे. लालबहाद्दूर शास्त्री भवन शेजारील खुल्या पटांगणात, पावसापासून संरक्षित अशा भव्य जर्मन हँगर मंडपामध्ये हा कार्यक्रम पार पडणार असल्याची माहिती फौंडेशनचे अध्यक्ष एन. एच. पाटील यांनी दिली.
यंदा यूपीएससी परीक्षेचा निकाल अपेक्षेपेक्षा सुमारे दीड महिना अगोदर जाहीर झाला असून महाराष्ट्रातून ६५ हून अधिक विद्यार्थ्यांनी या परीक्षेत यश संपादन केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यासाठी अभिमानास्पद बाब म्हणजे जिल्ह्यातील तब्बल सहा विद्यार्थ्यांनी या स्पर्धेत यश मिळवले आहे. गेल्या काही वर्षांत कोल्हापूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा स्पर्धा परीक्षांकडे पाहण्याचा दृष्टिकोन अधिक सकारात्मक होताना दिसत असून पुणे व दिल्लीसारख्या मोठ्या केंद्रांबरोबरच स्थानिक पातळीवर तयारी करूनही विद्यार्थी यशस्वी होत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्येही यूपीएससीबाबत जागरूकता आणि आकर्षण लक्षणीयरीत्या वाढत आहे.
या वर्षीच्या गौरव सोहळ्यास राज्यातील विविध जिल्ह्यांमधून २५ हून अधिक यशवंत उपस्थित राहणार असून त्यांच्या अनुभवातून आणि मार्गदर्शनातून स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठी प्रेरणा मिळणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमामध्ये यशवंतांचे भाषण आणि मुक्त संवाद हा मुख्य आकर्षणाचा केंद्रबिंदू असतो. सुराज्य फौंडेशन ही वारणा समूहाशी निगडीत सामाजिक संस्था असून सन २००८ पासून ‘व्हिजन’ गौरव सोहळ्याच्या माध्यमातून देशाच्या सर्वोच्च प्रशासकीय सेवांबाबत सकारात्मक मानसिकता घडविण्याचे कार्य सातत्याने करत आहे. या उपक्रमाद्वारे महाराष्ट्राचा देशाच्या प्रशासनातील सहभाग वाढविण्याचा प्रयत्न केला जात आहे.
या उपक्रमातून प्रेरणा घेऊन अनेक विद्यार्थ्यांनी यूपीएससी परीक्षेत यश मिळवले आहे. त्यामध्ये निहाल कोरे (मिरज), ओमकार शिंदे, काजोल पाटील (शाहूवाडी), प्रवीण इंगवले, आशिष पाटील (साळशी), अजिंक्य माने (इस्लामपूर) आणि स्वागत पाटील (सांगली) यांचा उल्लेख करता येईल. या गौरव सोहळ्यात यशस्वी विद्यार्थ्यांचा कोल्हापुरी फेटा, विशेष स्मृतीचिन्ह तसेच सहकार महर्षी तात्यासाहेब कोरे लिखित ‘मी एक कार्यकर्ता’ हे आत्मकथन आणि ‘अमृततरंग’ या पुस्तकांच्या भेटीसह वारणा समूहाच्या प्रमुख उत्पादनांनी सन्मान करण्यात येणार आहे. हा सत्कार वारणा समूहाचे प्रमुख आमदार डॉ. विनय कोरे (सावकर) यांच्या हस्ते पार पडणार आहे.
याचबरोबर सुराज्य फौंडेशनतर्फे २००७ पासून राबविण्यात येणाऱ्या ‘सुराज्य स्पर्धा परीक्षा फाउंडेशन कोर्स’ अंतर्गत इयत्ता आठवी व नववीतील गुणवंत विद्यार्थ्यांचाही या कार्यक्रमात यशवंतांच्या हस्ते गौरव करण्यात येणार आहे. यामुळे लहान वयापासूनच स्पर्धा परीक्षांची गोडी निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. सन २००८ पासूनचे सर्व ‘व्हिजन’ गौरव सोहळ्यांचे व्हिडिओ ‘Warana Vishva’ या यूट्यूब चॅनेलवर उपलब्ध करून देण्यात आले असून ते विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक ठरत आहेत. या कार्यक्रमाचा लाभ केवळ विद्यार्थ्यांनाच नव्हे, तर विविध क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी, उद्योजक आणि पालकांनाही होत असल्याचे दिसून येते.
दरवर्षी या कार्यक्रमास कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, बेळगावसह राज्यभरातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित राहतात. यंदाही सुमारे २० हजारांहून अधिक लोक उपस्थित राहण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
‘व्हिजन २०२६’ गौरव सोहळा दुपारी १.१५ वाजता सुरू होणार असून, उपस्थितांनी १२.३० वाजेपर्यंत कार्यक्रमस्थळी उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. या ज्ञानचळवळीचा अधिकाधिक लोकांनी लाभ घ्यावा आणि यशवंतांच्या मार्गदर्शनातून प्रेरणा घेऊन भविष्यात प्रशासकीय सेवेत योगदान द्यावे, असेही आवाहन करण्यात आले आहे.
अजून वाचा 👇 :
📰घरगुती गॅस 100% घरपोच देण्याचे आदेश; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे कंपन्यांना कडक निर्देश
📰 स्व. केदार पाटील यांच्या १३व्या स्मृतिदिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रम...
📰 जोतिबा चैत्र पौर्णिमा यात्रेसाठी प्रशासन सज्ज; भाविकांना अडचण नको – जिल्हाधिकारी अमोल येडगे

0 Comments