S G GROUP

S G GROUP
📣 कॉल करा – जाहिरात मिळवा: 7463963939

'नशामुक्त युवा' अभियानात सहभागी होण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन...

नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ अभियानात तरुणांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड 

कोल्हापूर येथे माय भारत जिल्हा सल्लागार समितीच्या बैठकीत ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ अभियानाबाबत मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड

कोल्हापूर प्रतिनिधी  :

जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांच्या अध्यक्षतेखाली माय भारत (MY Bharat) जिल्हा सल्लागार समितीची पहिली बैठक संपन्न झाली. बैठकीत माय भारत उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील युवक-युवतींचा विकासात्मक, सामाजिक आणि राष्ट्रनिर्माणाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग वाढविण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी युवकांना तंत्रज्ञान, स्वयंसेवा, कौशल्यविकास आणि विविध संधी उपलब्ध करून देण्यासाठी माय भारत हे प्रभावी व्यासपीठ असल्याची माहिती देण्यात आली. बैठकीस जिल्हा युवा अधिकारी स्वप्नील देशमुख, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस तसेच जिल्हा सल्लागार समितीचे सदस्य उपस्थित होते.

बैठकीत ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ या देशव्यापी अभियानाची माहिती देण्यात आली. संगीत, नृत्य, कविता, वादविवाद, चित्रकला, घोषवाक्य लेखन, रील/लघुपट तसेच नुक्कड नाटक अशा विविध स्पर्धात्मक विभागांमध्ये युवकांना सहभागाची संधी उपलब्ध करून देण्यात आली असून, नशामुक्त भारताचा संदेश प्रभावीपणे समाजापर्यंत पोहोचविण्यासाठी मोठ्या संख्येने या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड यांनी केले. या अभियानात सहभागी होण्यासाठी युवकांनी ऑनलाइन नोंदणी करून सहभाग नोंदवावा, असेही त्यांनी सांगितले. तसेच जिल्ह्यातील महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, युवक मंडळे, स्वयंसेवी संस्था आणि संबंधित विभागांनी या अभियानाचा व्यापक प्रचार-प्रसार करून अधिकाधिक युवकांना सहभागी करून घ्यावे, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.

नशामुक्त, सशक्त आणि विकसित भारताच्या निर्मितीसाठी युवकांचा सक्रिय सहभाग अत्यंत महत्त्वाचा असून, कोल्हापूर जिल्ह्यातून या अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळेल, असा विश्वासही यावेळी व्यक्त करण्यात आला. ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ अभियानांतर्गत युवक-युवतींसाठी संगीत, नृत्य, रील/लघुपट, नुक्कड नाटक, कविता, वादविवाद, घोषवाक्य लेखन आणि चित्रकला अशा आठ सर्जनशील विभागांमध्ये सहभागाची संधी उपलब्ध आहे. या विविध माध्यमांतून व्यसनमुक्तीचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचविणे, जनजागृती घडवून आणणे आणि विकसित भारताच्या निर्मितीत युवकांचे योगदान वाढविणे हा या उपक्रमाचा प्रमुख उद्देश आहे. अभियानात सहभागी होणाऱ्या युवकांना ई-प्रमाणपत्रही प्रदान करण्यात येणार आहे.



Post a Comment

0 Comments