कोडोली प्रतिनिधी :
वर्ल्ड इलेव्हन फुटबॉल अकॅडमीच्या नियोजनातून आयोजित करण्यात आलेल्या १७ वर्षांखालील फुटबॉल स्पर्धा कोडोली हायस्कूलच्या मैदानावर उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाल्या. स्पर्धेत विविध शाळांच्या संघांनी सहभाग नोंदवत उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. सामन्यांमध्ये खेळाडूंनी कौशल्य, शिस्त, संघभावना आणि खिलाडूवृत्तीचे दर्शन घडविले. स्पर्धेत संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, अतिग्रे संघाने प्रथम क्रमांक मिळविला. आदर्श गुरुकुल, पेटवडगाव संघाने द्वितीय, तर विद्यापीठ हायस्कूल, कोल्हापूर संघाने तृतीय क्रमांक पटकावला. विजेत्या संघांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिके व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून सतीश पाटील सर, अजिंक्य पाटील, अमोल पाटील, मोहन साखरपे सर आणि राहुल रोकडे सर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. तसेच पालक, प्रशिक्षक, क्रीडाप्रेमी आणि फुटबॉल रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. खेळाडूंना स्पर्धात्मक व्यासपीठ मिळावे आणि त्यांच्यातील फुटबॉल कौशल्याला योग्य दिशा मिळावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेचे उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले.
स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी वर्ल्ड इलेव्हन फुटबॉल अकॅडमीचे पदाधिकारी, प्रशिक्षक, पंच, स्वयंसेवक, सहभागी संघांचे खेळाडू आणि पालक यांनी विशेष परिश्रम घेतले.

0 Comments