यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न... Yashwantrao Chavan Warana Mahavidyalaya (YCWM)


वारणानगर येथील यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण समारंभात बास्केटबॉल चा राष्ट्रीय खेळाडू क्षितिज बेनाडे याला पारितोषिक प्रदान करताना प्रा. डॉ. शरद बनसोडे, डॉ. मिलिंद हिरवे, सोबत प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम, प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर, प्रा.अण्णासो पाटील व इतर सहकारी प्राध्यापक


वारणानगर/ प्रतिनिधी : 

यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ मोठ्या उत्साहात संपन्न झाला. खेळ, क्रीडा राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, गुणवत्तेमध्ये प्रत्येक वर्गातून पहिल्या तीन क्रमांकाचे यश प्राप्त केलेल्या विद्यार्थ्यांना जवळपास दीड लाखाहून अधिक रकमेची पारितोषिके, रोख रक्कम व भेट वस्तू स्वरूपाने प्रदान करण्यात आली. श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाचे अध्यक्ष आमदार डॉ. विनय कोरे -सावकर यांनी खेळाडू आणि यशस्वी प्राध्यापक विद्यार्थ्यांच्या गुणगौरवाबद्दल शुभेच्छा दिल्या. समारंभास प्रमुख पाहुणे म्हणून क्रीडा क्षेत्रातील नामवंत आणि आंतरराष्ट्रीय बास्केटबॉल चे पंच, क्रीडा व शारीरिक शिक्षण संचालक (शिवाजी विद्यापीठ,कोल्हापूर) प्रा. डॉ. शरद बनसोडे आणि पेठवडगाव येथील प्रसिद्ध स्त्री रोग तज्ञ, वैद्यकीय आणि सामाजिक क्षेत्रातील प्रसिद्ध कार्यकर्ते महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी डॉ. मिलिंद हिरवे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. श्री वारणा विभाग शिक्षण मंडळाच्या प्रशासकीय अधिकारी डॉ. वासंती रासम यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर होते.

प्रारंभी क्रीडा संचालक आण्णासो पाटील यांनी क्रीडा क्षेत्रातील महाविद्यालयातील विद्यार्थी - विद्यार्थिनीनी राष्ट्रीय स्तरापर्यंत मल्लखांब, फुटबॉल, बास्केटबॉल, इत्यादी खेळ प्रकारांमध्ये आणि आर्चरी, भालाफेक, थाळीफेक, गोळा फेक इत्यादी वैयक्तिक खेळ प्रकारात उल्लेखनीय कार्य केलेल्या विद्यार्थ्यांच्या कामगिरीचा आढावा घेऊन अहवाल वाचन केले. खेळ प्रकारात उल्लेखनीय राष्ट्रीय स्तरापर्यंत कार्य केलेल्या २०० हून अधिक विद्यार्थ्यांना भेटवस्तू आणि राष्ट्रीय स्तरावरील विशेष उल्लेखनीय कार्याबद्दल  विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक हजार रुपये देऊन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. महाविद्यालयातील १८ प्राध्यापक आणि प्राध्यापकेतर कर्मचाऱ्यांनी केलेल्या उल्लेखनीय कार्याबद्दल त्यांचाही सन्मान करण्यात आला.

प्रा. सौ. संध्या साळुंखे, प्रा. सौ. सीमा काटकर यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी बोलताना डॉ. शरद बनसोडे म्हणाले की," वारणानगरी ने खेळ, क्रीडा, शिक्षण, उद्योग, व्यवसाय, समाजकारण, अर्थकारण, सहकार चळवळ आणि राजकारणाला एक नवी दिशा दिली असून वारणानगरी देशाला दिशा देणारे 'पावर हाऊस' आहे. डॉ. मिलिंद हिरवे यांनी वारणेच्या माध्यमातून शिक्षण, समाजसेवा करण्याची उर्मी तरुणवयात शिक्षण घेत असताना प्राप्त झाली. अर्धपोटी राहून अंधाऱ्या रात्रीही मंदिरातील दिव्याच्या खाली अभ्यास केल्याचे सार्थक झाले त्याचीच जाणीव ठेवून समाजातील गरजूंच्या साठी वेगवेगळ्या माध्यमातून कार्य करण्याची प्रेरणा मिळाली. वारणा देशातील एक आदर्श संस्काराचे केंद्र आहे", त्याचा अभिमान असल्याचे ही ते म्हणाले.

दिव्यांग राष्ट्रीय खेळाडू दिल्ली येथे एशिया गेम मध्ये आठ गोल्ड मेडल प्राप्त करणारी विद्यार्थिनी अस्मिति कवारेला पारितोषिक प्रदान करताना डॉ. वासंती रासम, डॉ .मिलिंद हिरवे


प्रशासकीय अधिकारी प्रा. डॉ. वासंती रासम म्हणाल्या की, वारणानगरी नवीन शैक्षणिक धोरणाला सामोरे जाण्यासाठी तयार असून राष्ट्रीय छात्रसेना, एकात्मिक क्रीडा पदवी अभ्यासक्रमासारखे नवीन अभ्यासक्रम काळानुरूप विद्यार्थ्यांच्या साठी सुरू करणे आवश्यक आहे. उद्योग व्यवसायातील गरजा आणि आवश्यक मनुष्यबळ निर्मितीसाठी कार्य करण्याची  गरज असल्याचे ही त्या म्हणाल्या.

स्वागत व प्रास्ताविक प्राचार्य डॉ. प्रकाश चिकुर्डेकर यांनी केले. ते म्हणाले की, शिवाजी विद्यापीठाने केलेल्या शैक्षणिक गुणवत्ता मूल्यांकनात महाविद्यालयाने 'ए प्लस' श्रेणी प्राप्त केली असून लवकरच महाविद्यालय चौथ्यांदा नॅक ला सामोरे जात आहे. कोरोनासह  तीन वर्षांच्या कालखंडात विद्यार्थ्यांच्या  मानसिकतेत प्रचंड बदल झाला असून शिक्षण क्षेत्रासाठी हा कठीण काळ असल्याचे ते म्हणाले. राष्ट्रीय छात्र सेना, राष्ट्रीय सेवा योजना, संशोधन,खेळ, क्रीडा, वक्तृत्व, वादविवाद, सांस्कृतिक स्पर्धांमधून महाविद्यालयातील ५०० हून अधिक विद्यार्थी- विद्यार्थिनींनी चमकदार कामगिरी केली असून  महाविद्यालयाने शिवाजी विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत ३५ हून अधिक विद्यार्थी विविध अभ्यासक्रमातून स्थान प्राप्त केले आहे. दोन विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांची शिष्यवृत्ती प्राप्त झाली असून कार्पोरेट,उद्योग क्षेत्रातील विविध कंपन्यांच्या माध्यमातून ३०० हून अधिक विद्यार्थ्यांना  महाविद्यालयात प्रत्यक्ष मुलाखती घेऊन नोकरीच्या संधी उपलब्ध करून देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

आभार प्रा. क्रांतीकुमार पाटील यांनी मानले. यावेळी प्राचार्य एस.एन. शेख समन्वयक सर्वश्री वैभव बुड्ढे, प्रा. नितीन कळंत्रे, प्रा. एस. के. आतीरकर, प्रा. डी.ए. खोत, प्रबंधक बाळासाहेब लाडगावकर यांच्यासह प्राध्यापक व प्राध्यापकेतर कर्मचारी विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


 Promoted content :  

🔴 वारणानगर मध्ये महिला दिनानिमित्त शोभाताई कोरे आईसाहेब स्त्री कर्तृत्व सन्मान पुरस्कार सोहळा संपन्न...
🔴 यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयामध्ये शेअर बाजारातील संधी, समज व गैरसमज या विषयावरील व्याख्यानाचे आयोजन.
🔴 महाराष्ट्र हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज, कोल्हापूर चा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न 
🔴 व्हिजन ग्रीन काखे तर्फे २०२५ झाडांचे वृक्षारोपण करण्याचा संकल्प.../ Vision Green Kakhe
🔴 यशवंतराव चव्हाण वारणा महाविद्यालयाच्या वतीने हिंदी विषयाच्या आंतरराष्ट्रीय अधिवेशनात देशातील व परदेशातील प्रतिनिधींनीसह ७७० हून अधिक हिंदी प्रेमी संशोधक अभ्यासकांचा सहभाग.


Post a Comment

0 Comments